अनुवाद 15:1-22 IRVMar - Bible AI

1प्रत्येक सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे.

2त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्यास परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.

3परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.

4तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरुन आशीर्वाद देणार आहे

5पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा.

6मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.

7तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका.

8त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.

9कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हास पाप लागेल.

10तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हास परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल.

11गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.

12एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा.

13पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका.

14तर तुझी गुरे, खळे, द्राक्षकुंड यातून उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास भरभरुन मिळाले आहे, त्या प्रमाणात त्यास दे.

15आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हास आज ही आज्ञा देत आहे.

16असे घडेल की, तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासुन दूर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही.

17तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.

18दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हास जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हास द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षात ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल.

19तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका.

20दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.

21पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बली देऊ नका.

22वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>