गणना 4:1-48 IRVMar - Bible AI

1परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला, तो म्हणाला,

2लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)

3तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची गणती कर. हे पुरुष दर्शनमंडपातली सेवा करण्यासाठी सैन्यात जातात त्यांची गणती कर.

4कहाथ वंशजांनी दर्शनमंडपामधील परमपवित्र वस्तू ज्या माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्यांची त्यांनी काळजी घ्यावी.

5जेव्हा छावणी आपला तळ पुढे हलविण्याची तयारी करील, तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी तंबूत जाऊन परमपवित्र स्थानातील पडदा जो पवित्रस्थानापासून वेगळा करतो तो खाली काढावा व त्याने कराराचा कोश झाकावा.

6मग त्यांनी कोशावर तहशाच्या + एक समुद्री प्राणी*कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यांनी तो वाहून नेण्यासाठी दांडे लावावे.

7त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी.

8त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या कातड्याने झाकून टाकावे; तो वाहून नेण्यासाठी मेजाला दांडे बसवावे.

9त्यांनी दीपस्तंभ आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.

10या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या चौकटीवर त्यांनी ठेवावे.

11त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.

12मग पवित्रस्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे.

13मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे.

14नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्नीपात्रे, काटे, फावडी व कटोरे या वेदीच्या सर्व वस्तू गोळा करून त्या वेदीवर ठेवाव्यात; मग तिच्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.

15अहरोन व त्याचे पुत्र ह्यानी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत. दर्शनमंडपामधील जी ओझी कहाथवंशजांनी वाहावयाची ती हीच.

16पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल, सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.

17परमेश्वर मोशे व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,

18तुम्ही कहाथी वंशातल्या कुळाचा वंश लेव्यातून काढून टाकण्याची परवानगी देऊ नका;

19जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे.

20पवित्र स्थानातील वस्तू पाहण्यास त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये किंवा गेले तर ते मरतील. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन कहाथीतल्या एकएकाला त्याचे काम व त्याचे विशेष काम नेमून द्यावे.

21परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,

22गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याच्याप्रमाणे त्यांची यादी कर;

23म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र असतील अशा लोकांची गणती कर.

24गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशीः

25त्यांनी निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन आणि त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,

26निवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, या सर्व वस्तू गेर्षोनी कुळांनी वहाव्यात; आणि या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे.

27गेर्षोनी लोकांनी त्यांना नेमून दिलेली कामे वाहने आणि जी सर्व सेवा, अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या आज्ञेवरून करावी. त्यांचा भार त्यांच्याकडे सोपवावा.

28गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्यांच्या हाताखाली त्यांनी कामाची जबाबदारी पार पाडावी.

29मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी या प्रमाणे गणती कर.

30म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दर्शनमंडपामधील सेवा करण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती कर.

31दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.

32तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे व निगा राखण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या मनुष्यांच्या नावांची यादी करा व प्रत्येकाने नक्की काय वाहून न्यायचे ते त्यास सांगा.

33दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.

34मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली.

35त्यांनी, दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली.

36ज्या पुरुषांची त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास लोक होते.

37कहाथी वंशापैकी जे दर्शनमंडपामध्ये पवित्र सेवा करीत त्यांची गणती करण्यात आली. मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.

38तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली;

39म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेले तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली.

40ज्या पुरुषांची, त्यांचे वंश व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.

41गेर्षोनी कुळांपैकी नोंद घेतलेले जे सर्व दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असत, ज्यांची नोंद मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केली.

42त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली,

43म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र होते ते सर्व,

44ज्या पुरुषांची त्यांच्या कुळास अनुसरून गणती झाली ते तीन हजार दोनशे भरले.

45मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले.

46तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यानी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.

47तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व दर्शनमंडपामधील सेवा करण्यास व ओझे वाहण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली;

48त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>