दानीएल 12:1-13 IRVMar - Bible AI

1आणि मीखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानांसाठी उभा असतो तो त्या समयी उभा राहील; आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल; आणि त्या वेळेस तुझे लोक सोडवले जातील, प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल.

2अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील.

3जे सुज्ञ ते आकाशातील प्रकाशासारखे चकाकतील आणि जे पुष्काळास न्यायीपणाकडे वळवणारे सदासर्वदा ताऱ्याप्रमाणे चमकतील.

4पण तू दानीएला, ही वचने आणि पुस्तकाचे रहस्य गुप्त ठेव, अगदी अंतसमयापर्यंत अनेक लोक इकडे तिकडे धावतील आणि ज्ञान वाढत जाईल.

5मग मी दानीएलाने पाहिले आणि तिथे दोघे उभे होते एक नदीच्या या काठवर उभा होता आणि दुसरा पलीकडील काठावर उभा होता.

6त्यापैकी एकाने तागाची वस्त्रे घातलेल्यास विचारले जो नदीच्या पाण्यावर होता या अद्भुत गोष्टीचा अंत होण्यास किती वेळ लागेल?

7मी त्याची वाणी एकेली जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हटले, जो सदाजीवी आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्धा समय, साडे तीन वर्ष जेव्हा पवित्रजनांच्या बलाचा चुराडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले.

8मी ऐकले, पण मला समजले नाही तेव्हा मी विचारले, “माझ्या स्वामी, ह्याचा परिणाम काय?”

9तो म्हणाला, दानीएला स्वस्थ रहा, कारण ही वचने मुद्रित करून अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.

10पुष्कळ शुध्द, स्वच्छ आणि पवित्र केले जातील पण दुष्ट दुष्टपणा करतील, दुष्टांपैकी कोणास समजणार नाही पण जे ज्ञानी ते समजतील.

11रोजचे बलीहवन या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल तेव्हापासून 1, 290 दिवस लोटतील.

12जो धीराने 1, 335 दिवस वाट पाहील तो धन्य.

13तू आपल्या मार्गाने अंतापर्यंत जा, तू तुझे वतन प्राप्त करायला शेवटच्या दिवसात उठविला जाशील.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>