मत्तयकृत शुभवर्तमान 25:1-45 IRVMar - Bible AI

1तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.*

2त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या.*

3मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही.*

4शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले.*

5आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या*

6मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा!*

7सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले.*

8तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत.*

9पण शहाण्यांनी उत्तर देऊन म्हणले; ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या.*

10त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला.*

11नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा*

12पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही.*

13म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही.*

14कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासास जाण्याअगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली.*

15+ 5 किक्कार, 3 किक्कार, 1 किक्कार; एक किक्कार म्हणजे साधारण 20 वर्षांची मजुरी *त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासास गेला.*

16ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या.*

17त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या.*

18पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले.*

19बराच काळ लोटल्यानंतर त्या चाकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली.*

20ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली.*

21त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!*

22नंतर ज्या मनुष्यास दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला; मालक, तुम्ही मला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन हजार कमवल्या आहेत.*

23मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!*

24नंतर ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता.*

25मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत!*

26मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.*

27तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.*

28म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या.*

29कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल, पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.*

30नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेरच्या अंधारात टाक. तेथे रडणे व दात खाणे चालेल, मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील.*

31मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल.*

32मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो.*

33तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.*

34मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.*

35हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले*

36मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला.*

37मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले?*

38आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले?*

39आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो?*

40मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.*

41मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.*

42ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही.*

43मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.*

44मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी किंवा तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?*

45मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.*

r>