मत्तयकृत शुभवर्तमान 7:1-28 IRVMar - Bible AI

1इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत.*

2कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल.*

3तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?*

4अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे.*

5अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल.*

6जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येवून तुम्हासही फाडतील.*

7मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.*

8कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते.*

9तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल?*

10किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल?*

11वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?*

12यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.*

13अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत.*

14पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.*

15खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.*

16त्यांच्या फळांवरुन तुम्ही त्यांस ओळखाल. काटेरी झाडाला द्राक्षे लागतात काय? किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येताच काय?*

17त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते.*

18चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत.*

19जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते.*

20यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.*

21मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल.*

22त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय?*

23तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.*

24जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले.*

25मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.*

26जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले.*

27मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”*

28येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला.

>