योहानकृत शुभवर्तमान 15:1-26 IRVMar - Bible AI

1“मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.*

2माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्‍या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो.*

3जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.*

4तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्यास आपल्याआपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हासही देता येणार नाही.*

5मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करीता येत नाही.*

6कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्यास फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.*

7तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल.*

8तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.*

9जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे; तसेच तुम्हीही माझ्या प्रीतीत रहा.*

10जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत रहाल.*

11माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत.*

12जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.*

13आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.*

14मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.*

15मी तुम्हास आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासास कळत नाही; पण मी तुम्हास मित्र म्हणले आहे, कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व मी तुम्हास कळवल्या आहेत.*

16तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले आणि नेमले आहे; यामध्ये हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे.*

17तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करतो.*

18जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे.*

19जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हास जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते, *

20‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याही पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील.*

21पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील; कारण ज्याने मला पाठवले त्यास ते ओळखीत नाहीत.*

22मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.*

23जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.*

24जी कामे दुसर्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.*

25तथापि ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.*

26पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.*

r>