योहानकृत शुभवर्तमान 4:1-53 IRVMar - Bible AI

1येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले.

2(तरी, येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नव्हता पण त्याचे शिष्य करीत होते)

3तेव्हा तो यहूदीया प्रांत सोडून पुन्हा गालील प्रांतात गेला.

4आणि त्यास शोमरोन प्रांतातून जावे लागले.

5मग तो शोमरोन प्रांतातील सूखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते.

6तेथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते.

7तेथे एक शोमरोनी स्त्री पाणी काढाण्यास आली. येशू तिला म्हणाला, “मला प्यायला दे.”*

8कारण त्याचे शिष्य गावात अन्न विकत घ्यायला गेले होते.

9तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यास म्हणाली, “आपण यहूदी असून माझ्यासारख्या एका शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर कोणतेही व्यवहारीक संबंध ठेवत नव्हते.

10येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”*

11ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, पाणी काढायला आपल्याजवळ काही नाही व विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कोठून?

12आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली, तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?”

13येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्यास पुन्हा तहान लागेल, *

14परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”*

15ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.”

16येशू तिला म्हणाला, “जा, तुझ्या पतीला बोलावून आण.”*

17ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “तू ठीक बोललीस की, ‘तुला पती नाही;’*

18कारण तुला पाच पती होते आणि तुझ्याजवळ आता आहे तो तुझा पती नाही, हे तू खरे बोललीस.”*

19ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.

20आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम शहरात आहे.”

21येशू तिला म्हणाला, “मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर किव्हा यरूशलेम शहरात पित्याची उपासना करणार नाही, *

22तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे.*

23तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे.*

24देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”*

25ती स्त्री त्यास म्हणाली, “मी जाणते की, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला माहित आहे. तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी सांगेल.”

26येशू तिला म्हणाला, “तुझ्याशी बोलणारा मीच तो आहे.”*

27इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले, तरी कोणी असे म्हणले नाही की, “आपण काय विचारत आहात?” किंवा “आपण तिच्याशी का बोलत आहात?”

28ती स्त्री तेव्हा आपला पाण्याचा घडा तेथेच टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणाली,

29“चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?”

30तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.

31त्याचे शिष्य त्यास विनंती करून म्हणाले, “रब्बी, काहीतरी खाऊन घ्या.”

32पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हास माहीत नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.”*

33यावरुन शिष्य एकमेकांस म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणून दिले असेल काय?”

34येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.*

35अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हास म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.*

36कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक गोळा करतो; यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा.*

37‘एक पेरतो आणि दुसरा कापतो’, अशी जी म्हण आहे ती या बाबतीत खरी आहे.*

38ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाहीत ते कापायला मी तुम्हास पाठवले. दुसर्‍यांनी कष्ट केले होते व तुम्ही त्यांच्या कष्टात वाटेकरी झालेले आहात.”*

39“मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातल्या पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

40म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर, त्यांनी त्यास आपल्याबरोबर रहायची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला.

41आणखी कितीतरी लोकांनी त्याच्या वचनावरून विश्वास धरला.

42आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खरोखर जगाचा तारणारा आहे, हे आम्हास समजले आहे.”

43मग त्या दोन दिवसानंतर, तो तेथून गालील प्रांतात निघून गेला.

44कारण येशूने स्वतः साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.

45म्हणून तो गालील प्रांतात आल्यावर गालीलकरांनी त्याचे स्वागत केले; कारण त्याने सणात यरूशलेम शहरात केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या; कारण तेही सणाला गेले होते.

46नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता.

47येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता.

48त्यावर येशू त्यास म्हणाला, “तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.”*

49तो अंमलदार त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा.”

50येशू त्यास म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.”* तेव्हा तो मनुष्य, त्यास येशूने म्हटलेल्या वचनावर विश्वास ठेवून, आपल्या मार्गाने निघून गेला.

51आणि तो खाली जात असता त्याचे दास त्यास भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.”

52तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, “काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला.”

53यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,”* त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.

>