स्तोत्रसंहिता 18:1-49 IRVMar - Bible AI

1“हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.”

2परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो.

3जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन.

4मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरीले, आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे.

5अधोलोकांच्या + बन्यामीनी *बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले.

6मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.

7तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले,

8त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या, ज्याने कोळसे पेटले गेले.

9त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता.

10तो करुबावर स्वार झाला आणि वाऱ्याच्या पंखांनी वर उडत गेला.

11पावसाचे मोठे काळोख असे मेघ त्याने त्याच्याभोवती तंबू असे केले,

12त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले.

13परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या.

14परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले.

15तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने

16तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले.

17माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते.

18माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता.

19त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता.

20माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचयित केले कारण माझे हात निर्मळ होते.

21कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही.

22कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत.

23मी त्याच्यासमोर निर्दोष असा होतो, आणि मी स्वत:ला पापापासून दूर राखले.

24माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते.

25जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस,

26जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस.

27कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.

28कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो.

29कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून+ तट तुडवून* जाऊ शकतो.

30देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे.

31कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे?

32तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो.

33तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो!

34तो माझ्या हाताला युद्ध करावयाला आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवायला शिकवतो.

35तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे.

36तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.

37मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.

38मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.

39कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे.

40तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला.

41ते मदतीसाठी ओरडले, पण कोणीही त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वरास आरोळी केली, पण त्याने उत्तर दिले नाही.

42मी माझ्या शत्रूंचे वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले.

43मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला, तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहित नाहीत ते माझी सेवा करतील.

44ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील, ते परदेशी माझ्यापुढे शरण येतील.

45ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.

46परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो.

47हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो.

48मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरूद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यांपासून वाचवले.

49यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.

ticle>