स्तोत्रसंहिता 79:1-13 IRVMar - Bible AI

1हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत.

2त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे.

3त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते.

4आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.

5हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का? तुझी ईर्षा अग्नीसारखी कोठपर्यंत जळत राहील?

6जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपला क्रोध ओत.

7कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे.

8आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.

9हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.

10ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले, त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे.

11कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे; ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव.

12हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले त्यांच्या पदरी तो उलट सात पटीने घाल.

13मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ. आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ.

ticle>