१ राजे 3:1-27 IRVMar - Bible AI

1मिसराचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करून शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरूशलेमा सभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते.

2परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.

3राजा शलमोनही आपले वडिल दावीद यांनी सांगितलेल्या नियमांचे मन:पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. त्या गोष्टीखेरीज यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.

4राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.

5शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”

6तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस.

7माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही.

8तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत.

9म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?”

10शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला

11म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस.

12तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही.

13आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही.

14जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”

15शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरूशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यामध्ये त्याने परमेश्वरास शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.

16नंतर दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.

17त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती.

18तीन दिवसानंतर हिने पण बाळाला जन्म दिला. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहत होतो.

19एका रात्री ती बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मरण पावले.

20तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले.

21दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”

22पण तेवढ्यात ती दुसरी स्त्री म्हणाली, “नाही, जिवंत बाळ माझे आहे, मरण पावलेले बाळ तुझे आहे.” पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मरण पावले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्रकारे दोघीचांही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.

23तेव्हा राजा म्हणाला, “एक म्हणते जिवंत मूल माझे आणि मरण पावलेले बाळ तुझे आहे; दुसरी असे म्हणते नाही, मरण पावलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत जो माझा मुलगा.”

24राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.

25नंतर राजा म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करून त्याचे दोन तुकडे करु आणि एकीला अर्धा व दुसरीला अर्धा देऊ.”

26पण पहिल्या स्त्रीला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “हे माझ्या स्वामी नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.” दुसरी स्त्री म्हणाली, “बाळाचे दोन तुकडे करा.” म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.

27तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्यास पहिल्या स्त्रीच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
div>